satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
मानव विकास केंद्र

यशदातील पूर्वीच्या बालहक्क आणि विकास केंद्राचे रुपांतर सन २०१० साली मानव विकास केंद्रामध्ये झाले आणि केंद्राच्या कामाची व्याप्ती वाढली. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षण हे मानव विकास केंद्राचे प्रमुख कार्य आहे. ‘विश्लेषणाकडून कृतीकडे’ या तत्वावर मानव विकास केंद्र काम करते. मानव विकासाशी संबंधित निर्देशांकाची सांख्यिकी माहिती गोळा करुन त्याचे विश्लेषण करुन त्यावर आधारित धोरणात्मक कृती कार्यक्रम निश्चित करणे. प्रशिक्षण गरजा ओळखणे हे काम केंद्रामध्ये केले जाते.

उद्दिष्टे
  • शासनाला धोरणे तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करुन त्याचे विश्लेषण करणे.
  • शासनाच्या सूचनेनुसार सर्वेक्षण घेणे जेणेकरुन मानव विकासाशी संबंधित सांख्यिकी माहितीचे एकत्रीकरण होईल.
  • शिक्षण व आरोग्य या क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, ज्यामुळे राज्याची मानव विकासाची पातळी उंचावेल.
  • राज्याचा आणि जिल्ह्याचा मानव विकास अहवाल तयार करणे.
  • मानव विकासाशी संबंधित योजनांचे मूल्यमापन करणे.
मानव विकास केंद्रातंर्गत झालेली प्रमुख कामे

१.राज्य मानव विकास अहवाल

गतिमान, शाश्वत व सर्वसमावेशक वाढ हे तत्व केंद्रीभूत ठेवणा-या अकराव्या व बाराव्या पंचवार्षिक योजनांना समोर ठेऊन महाराष्ट्र मानव विकास अहवाल २०१२ मध्ये मानव विकासाचे विश्लेषण केले आहे. महाराष्ट्र मानव विकास अहवाल २००२ हा राज्याचा मानव विकासाची परिस्थिती दर्शविणारा पहिला प्रयत्न होता. त्यामध्ये वाढ, दारिद्रय, समानता, शिक्षण, आरोग्य व पोषण इ. पैलूंचा विचार केला होता. त्यानंतर राज्याने मानव विकासासंबंधी निर्देशाकांमध्ये भरीव प्रगती केली आहे. जसे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणे झाले आहे. आरोग्यविषयक सुविधांचे जाळे विस्तीर्ण आहे. मानव विकास अहवाल २०१२ मध्ये मानव विकासासंबंधी राज्याच्या सद्यस्थितीचे विश्लेषण केले आहे, त्याचबरोबर विकासातील असमानता, क्षमता संवर्धन, मानव विकासातील प्रगती, त्यातील कमतरता आणि मानव विकासासाठी उपाययोजना यांचेही विवेचन केले आहे.
मानव विकासातील सर्वसमावेशकता या तत्वानुसार पंचअंगांनी मानव विकासाचे विश्लेषण केले आहे. स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी, विभाग, सामाजिक गट व उत्पन्न गट ही ती पाच अंगे आहेत. या पंचअंगांनी केलेल्या विश्लेषणातून मानव विकासाची उद्दिष्टे निश्चित करता येतील, सबळ पुराव्यावर आधारित धोरणाविषयक मार्गदर्शक तत्वे आखता येतील, तसेच विकासापासून वंचित घटकांना विकासाचे फायदे मिळवून देऊन सर्वसमावेशक मानव विकासाकडे कसा प्रवास करता येईल यासंबंधी दिशा देता येईल. मानव विकास अहवाल २०१२ ची हीच फलनिष्पत्ती आहे़!

२.योजनांचे मूल्यमापन

मानव विकास केंद्रातर्फे अनेक योजनांचे मूल्यमापन केले आहे. त्यापैकी मुलींसाठी सायकलींचे वितरण, शाळांमधील विज्ञान केंद्रे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांची व्याप्ती वाढवणे, मुलींसाठी बसची व्यवस्था या काही योजना आहेत.

३.जिल्हा विकास अहवाल आणि जिल्हा मानव विकास अहवाल

मानव विकास केंद्राने गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा जिल्हा विकास अहवाल तर नागपूर, नंदूरबार, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचा मानव विकास अहवाल तयार केला.

४.महाराष्ट्रातील तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक

मानव विकास केंद्रामार्फत महाराष्ट्रातील सर्व ३५६ तालुक्यांचे प्राथमिक सर्वेक्षण करुन त्या आधारावर प्रत्येक तालुक्याचा मानव विकास निर्देशांक काढला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच संशोधन अभ्यास आहे.

Maharashtra human development report 2012